महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या आगमनाला आता केवळ पंधरवडा उरला आहे. मात्र अद्यापही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांनुसार या वर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रकिया संथगतीने सुरू असल्याने अर्जाची मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. यापूर्वी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.