महाराष्ट्रातील सुमारे ३८ शहरे व ग्रामीण भागांतून २० हजार २७४ गुन्हे मोबाईल आणि इंटरनेटमुळे झाले आहेत. राज्यात मोबाईलच्या व्यसनातून सर्वाधिक गुन्हे पुणे आणि पाठोपाठ ठाण्यात झाले आहेत, अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली. पुनर्वसन केंद्राच्या मनोविकास - मानसोपचार आणि ध्यान केंद्रातर्फे माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीतून हे वास्तव समोर आले आहे.
राज्यातील प्रत्येक विभागाकडून किंबहुना प्रत्येक शहरातील सायबर सेलकडून ही माहिती केंद्राला मिळाली आहे. त्यामध्ये पुणे अव्वल स्थानी असून १३ हजार ३५७ गुन्ह्यांचे अर्ज पोलिसांकडे आले होते. त्यातील १२ हजार ६८३ खटले सोडविण्यात आले असून ६७४ खटले सोडविणे बाकी आहेत. पुण्यापाठोपाठ ठाण्यामध्ये १ हजार १९ गुन्हांची नोंद झाली आहे. यामध्ये मोबाईल, इंटरनेटमुळे झालेल्या आत्महत्या, खून, अपघातांचा समावेश आहे.
केंद्राचे समुपदेशक हर्षल पंडित यांनी या विषयासंदर्भात माहिती अधिकारामध्ये शासनाकडे अर्ज केला होता. पुण्यासह कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, लातूर, नागपूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव आणि मुंबईमधील गुन्ह्यांची संख्या काही शेकड्यांमध्ये आहे. तर, हिंगोलीमध्ये सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.