अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक 3 वर्षात पूर्ण करणार

पालक मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती एकीकडे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा वाद रंगला आहे. तर दुसरीकडे नाशिकचे पालक मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी येत्या तीन वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण करू अशी माहिती दिली आहे. नाशिकमध्ये विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्मारकाविषयी माहिती दिली. सोबतच नाशिकमध्ये येत्या १ जानेवारीला महाआरोग्य शिबीर घेतले जाणार असल्याचे सांगितले.   
 
अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा येत्या २४ तारखेला होऊ घातला आहे. या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांच्या वेगवेगळ्या परवानग्या सरकारने घेतल्या आहेत. आता पर्यावरणा संबंधातील कुठलीही मान्यता घेणे बाकी नाही. यासाठीच्या सगळ्या परवानग्याची पूर्तता झाली असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यातील 70 नद्यांचे पाणी आणि  गड-किल्ल्यांची माती  येत्या दोन दिवसात आणली जाणार असून यांमातीच्या मदतीने भूमिपूजन केले जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. हे स्मारक अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा