#MeToo मोहीम हि खरी असावी तिचा चुकीचा उपयोग नसावा - शिवसेना

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:03 IST)
#MeToo मोहीम ने देशातील राजकीय नेते, कलाकार, अधिकारी, पत्रकार असे अनेक अडचणीत आले आहेत. त्यामुळे ही मोहीम व्यापक होत आहे. मात्र मोहिमेचा उपयोग चांगला झाला तर ठीक, तो खोटा किंवा फक्त प्रसिद्धी साठी नको असावा, असे झाले तर या मोहिमेला विकृती निर्माण होईल असे शिवसेनेने सामनातून भूमिका स्पष्ट केली आहे. #MeToo मोहीम हे हत्यार अजिबात होता कामा नये त्यामुळे चुकीची गोष्ट होईल, महिलांचे रक्षण हे तर आद्य कर्तव्य आहेच मात्र मोहिमेचा गैरवापर होऊ नये असे शिवसेनेने अग्रलेखातून स्पष्ट केले आहे. अग्रलेख पुढील प्रमाणे. 
 
विनयभंग, व्यभिचार, बलात्कार या विकृतीला समाजात स्थान असूच नये आणि त्यास कुठली कवचकुंडलेही लाभू नयेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन कुणीही करणार नाही, पण पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करताना नव्या विकृत संस्कृतीचा उदय होणार असेल तर तो धोकाही रोखायला हवा. ‘मी टू’चे प्रकरण हे गैरवापराचे हत्यार बनू नये. महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती आहे. ती आपण जपलीच पाहिजे.
 
हिंदुस्थानात कधी कोणत्या विषयाची वावटळ निर्माण होईल व त्या वावटळीत भलेभले कसे गटांगळय़ा खातील याचा नेम नाही. पुन्हा अशा सर्व प्रकरणांत देशाची बदनामी होते याचा विचार कुणीच करीत नाही. दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड झाले. त्यानंतर देशातील अनेक बलात्कारांच्या घटनांना अशी प्रसिद्धी मिळू लागली की, दिल्ली ही बलात्काराची राजधानी म्हणून बदनाम झाली. आता ‘मी टू’ची वावटळ उठली आहे. वावटळीचे रूपांतर वणव्यात झाले असून नाटक, साहित्य, पत्रकारिता, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांतील दिग्गज मंडळींवर विनयभंगाचे व लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱया महिलांनी पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकरांपासून सुरू झालेले ‘मी टू’ प्रकरण केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यापर्यंत पोहोचले आहे व ही सर्व प्रकरणे देश-विदेशातील लोक मिटक्या मारीत चघळत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत देशाच्या साहित्य, संस्कृती, कला व राजकारणात चांगले काही घडलेच नाही व येथे फक्त हैवानशाहीचेच राज्य होते असे एक चित्र निर्माण झाले आहे. अर्थात हे चित्र बदलण्याचे काम आता या प्रकरणातील ‘संशयितां’नाच करावे लागणार आहे. महिलांच्या बाबतीत होणारे गैरवर्तन हा सर्वच दृष्टिकोनातून गंभीर विषय आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असले तरी समाजानेही महिलांबाबतचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेऊ नये. वास्तविक, आपल्या समाजात स्त्रीला देवी, माता असे संबोधले जाते. तरीही स्त्री अत्याचाराच्या घटना घडतात आणि ‘मी टू’सारख्या मोहिमांमधून त्याच्या कहाण्या बाहेर येतात हे दुर्दैवी आहे. अर्थात ज्या स्त्रीयांनी आता ‘मी टू’च्या लाटेवर स्वार होऊन तक्रारी केल्या आहेत त्या कोणी गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱया अडाणी स्त्रीया नाहीत. त्यांना कायद्याचे ज्ञान होतेच; पण त्यांच्याबाबतीत घटना घडल्यावर पाच, दहा, पंधरा वर्षांनी त्यांनी ही सर्व प्रकरणे पुढे आणली आहेत. वास्तविक, गैरवर्तनाचे प्रकार त्या क्षणीच पुढे आणायला हवेत. तनुश्री दत्ता, प्रिया रामाणी, नवनीत निशान, विनिता नंदा या प्रतिष्ठत महिलांनी ‘मी टू’मध्ये सामील होऊन नाना पाटेकर, एम. जे. अकबर, आलोकनाथ, वरुण ग्रोवर, विकास बहल अशा लोकांवर हे आरोप केले. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही तिच्याशी गैरवर्तन झाल्याचे म्हटले. यातील अनेकांना सरकारने ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती