बी. फार्म प्रशिक्षणार्थीना दुकानांमध्ये काम करण्याची परवानगी

गुरूवार, 23 मार्च 2017 (22:06 IST)
राज्यातील औषधे विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्टचा तुटवडा जाणवत असून त्यावर उपाययोजना म्हणून बी. फार्मच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ‘कमवा शिका योजनें’तर्गत या दुकानांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
सदस्य सर्वश्री महेश चौघुले, आशिष शेलार, योगेश सागर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, योग्य औषध देणे महत्वाचे असते अन्यथा ते रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. औषधे विक्री दुकानांमध्ये प्रशिक्षीत फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. असे प्रशिक्षीत फार्मासिस्ट ज्या दुकानांमध्ये नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
 
फार्मासिस्टचा तुटवडा जाणवत असून अशा परिस्थितीत ‘बी. फार्मसी’च्या विद्यार्थ्यांना ‘कमवा शिका योजनें’तर्गत औषध विक्री दुकानांमध्ये काम करण्याची परवानगी देण्याबाबत राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा