मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; चंद्रकांत पाटील म्हणातात, सरकारचा विरोध नाही
मुंबईत बुधवारी, 9 ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाऊ उद्यान (राणी बाग) ते आझाद मैदान अशा राज्यातील शेवटच्या मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आयोजकांनी तयारी पूर्ण केली असून वॉररूम सज्ज आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांचीही जय्यत तयारी पूर्ण झालीय. आता उत्सुकता आहे, ती अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची. 25 लाख मराठा राज्यभरातून या मोर्चासाठी मुंबईत येतील, असा विश्वास आयोजकांनी तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही व्यक्त केला आहे. राज्यभर आजवर निघालेले 57 मोर्चे अतिशय शांततेत पार पडल्याने कायदा-सुव्यवस्थेची चिंता नसली तरी निश्चितच सरकारच्या उरात धडकी भरणार आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने या मोर्चास पाठिंबा दिला आहे. मुंबईचे डबेवाले 126 वर्षात प्रथमच सुटी घेऊन मोर्चात सामील होणार आहेत. माथाडी कामगार संघटना व वाशीतील व्यापाऱ्यांनी मोर्चास पाठिंबा म्हणून एपीएमसीतील पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील 500 शाळांना सुटी देण्यात आली आहे. शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून मंगळवारी जाहीर केलेली भूमिका, सरकार मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना बळकटी देणारी ठरली आहे. मराठ्यांच्या अनेक संघटना आहेत; त्यांनी एकत्र चर्चेस यावे, असे सांगून सरकारने फूटनीतीचे धोरण जाहीर केले आहे.
आजवर राज्यभरात या मोर्चांना सामोरे जाण्यास टाळत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट क्रांती दिनी 'मराठा क्रांती'च्या शेवटच्या मोर्चास सामोरे जाण्याचे धाडस दाखवून राज्यभरातील लाखो मराठ्यांच्या हुंकाराचा मान राखतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.