भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर करा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मंगळवार, 3 जानेवारी 2023 (20:44 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर करावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. गेल्या अधिवेशनात पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत दिली होती. तसेच वॉर फुटिंगवर काम करुन महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करुन हे काम मार्गी लावावे, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. फक्त घोषणा केल्या जातात. मात्र त्याबाबत कृती शून्य असते, असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव असल्याचं राज ठाकरेंनी म्हटले आहे.
 
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडे वाड्यात रोवली, त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा सरकारने या अधिवेशनात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून एक रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही याची काळजी घ्या आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पाहा’, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती