कोरोनामुळे राज्यातील शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता टीव्ही आणि रेडिओवरून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहलं आहे.
'राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचं प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,' असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.