पर्यावरणासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांच्या वापरावर यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन सरन्यायाधीशांच्या निर्देशांवर आधारित जारी केलेल्या परिपत्रकाअंतर्गत २४ जुलै २०२४ रोजी ही बंदी घालण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने हा निर्णय मागे घेतला आहे आणि एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्या वापरण्यास परवानगी दिली आहे. सध्याच्या मुख्य न्यायाधीशांच्या आदेशानुसार, एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले, ज्याद्वारे ही बंदी उठवण्यात आली आहे. यानंतर आता न्यायालयाच्या आवारात येणारे नागरिक, वकील आणि इतर लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या सोबत आणू शकतील.