पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वेश्वराप्रमाणे मोठा विकास आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे. संवादातून बाधित नागरिक आणि दुकानदारांचे प्रश्न सोडविले जातील. मात्र यास सहकार्य करा, कारण नसताना वातावरण दूषित करू नका असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने पुन्हा एकदा पंढरपूर कॉरिडॉरचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
नागरिकांच्या विरोधामुळे बासनात बांधून ठेवलेल्या या २,५०० कोटी रुपयाच्या प्रकल्पावर पुन्हा काम सुरु असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितल्यावर नागरिकात मोठी अस्वस्थता आहे. नागरिकांशी संवाद करत सूक्ष्म, शास्त्रशुद्ध पद्धतीने समाधानकारक तोडगा काढला जाईल. कारण नसताना वातावरण दूषित करू नका असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले आहे.
या आराखड्यात ज्या नागरिकांची घरे आणि दुकाने पाडून हा आराखडा बनवला जाणार आहे. त्यांना अद्याप कोणतीच माहिती प्रशासनाकडून मिळालेली नसल्याने हे बाधित नागरिक आणि व्यापा-यात या आराखड्याबाबत मोठा असंतोष आहे. यातील सर्वात वादाचा मुद्दा हा कॉरिडॉर असून ज्या ठिकाणी ४० फुटी रस्ता होता तिथे ४०० फूट असे १० पट जास्त रुंदीकरण केले जाणार असल्याने वर्षानुवर्षे मंदिर परिसरात राहणारे आणि व्यवसाय करणारे शेकडो नागरिक विस्थापित बनत आहेत. याशिवाय मंदिराकडे येणा-या आणि चंद्रभागेकडे जाणा-या २२ रस्त्यांसह शहरातील ३९ मार्गांचे रुंदीकरण करण्याचे यात प्रस्तावित आहे. त्यामुळे याचा फटकाही शेकडो नागरिकांना बसणार आहे.