विधानपरिषदेला गाफील राहणार नाही- सतेज पाटील

गुरूवार, 16 जून 2022 (15:35 IST)
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांना ईडी चौकशी लागली आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यामध्ये उद्यापासून निदर्शने करणार आहोत. विधानपरिषदेची तयारी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार १७ आणि १८ जूनला एकत्र येणार आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे १०० टक्के उमेदवार निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील  यांनी व्यक्त केला. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर नेमकी कशी तयारी करण्यात आली हे सांगितले.
 
भाजपवर टीका करताना सतेज पाटील म्हणाले, भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. पंकजा मुंडे  यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे ओबीसी आमदार नाराज आहेत. त्याचा परिणाम विधान परिषदेतील मतदानानंतर भाजपला दिसेल. अनेक भाजप आमदारांना वेगळ्या गोष्टी सांगून भाजपमध्ये नेण्यात आले होते. नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असे सांगून भाजपाने आपल्याकडे वळवले. २०१९ मध्ये विधान परिषदेसाठी किमान १०० उमेदवार जाहीर केले होते. मात्र गेल्या अडीच वर्षात यातील कोणताच शब्द भाजप पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे भाजपात अलबेल आहे असे समजू नये त्यांच्यातही प्रचंड नाराजी आहे असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती