राखीव असणार्या लातूर लोकसभा मतदारसंघात मातंग समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मातंग परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव काळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. आपले म्हणणे मांडताना अशोकराव काळे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत हा समाज उपेक्षित आहे. राज्यात मातंग समाजाची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास असून लातूर मतदारसंघात एक ते दीड लाख समाज आहे. हा समाज प्रारंभापासून कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. असे असतानाही पक्षाने जयवंतराव आवळे यांच्यासारख्या बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली. नंतरच्या निवडणुकीतही मातंग समाजाला डावलण्यात आले. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मतदारसंघासाठी स्थानिक ५५ उमेदवारांनी कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केली आहे. यापैकी मातंग समाजाला प्रतिनिधीत्व देऊन आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणीही अशोकराव काळे यांनी केली. पक्षाने आपल्या नावाचा विचार केला नाही तर जो उमेदवार पक्ष देईल त्याच्यासाठी काम करून त्याला निवडून आणू असेही ते म्हणाले.