यावल पूर्व आणि पश्चिम वन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सागवान लाकडासह खैर लाकडाची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावल वन विभागातील यावल येथील पूर्व व पश्चिम वन विभागात खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. मौल्यवान अशा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या १० वाहनामागे फक्त १ वाहन पकडण्याचा देखावा वन विभागाकडून होत आहे. त्यामुळे मौल्यवान काथ बाजारात आणि शासनाला कोट्यावधी रुपयाचा चुना लावण्याचा प्रकार सातपुड्यात होत असल्याचे उघड उघड चर्चिले जात आहे.
सविस्तर असे की, जानेवारी २०२४ महिन्याच्या सुरुवातीला यावल पश्चिम वन विभागात अवैध खैर लाकडाचे वाहतूक करतानाचे बोलोरो वाहन वन विभागाने पकडले होते. त्यानंतर पूर्व वन विभागात न्हावी, बोरखडे परिसरात गेल्या आठवड्यात मोटरसायकलवरून खैर लाकडाची वाहतूक करताना मोटरसायकल पकडली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले की, आरोपींना फरार करण्यास मदत करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या सातपुडा कार्यक्षेत्रात आणि अभयारण्य परिसरात खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. खैर आणि सागवानी लाकडाची तस्करी करणारे यावल-रावेर तालुक्यात ठिकठिकाणी आहेत. कोणाचे लाकडाचे व्यवसाय आणि काही फर्निचरची दुकाने कुठे आहेत, त्याची माहितीही वन विभागाला आहे. त्यापैकी ज्यांचे नियमित मासिक हफ्तेे आहे, त्यांचा माल पकडला जात नाही. जे हप्ते देत नाहीत त्यांचा माल कारवाईच्या नावाखाली पकडला जातो. अशा प्रकारे वनविभागाची कारवाई सुरू आहे.