जरीपटका ठाण्यांतर्गत २३ दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी लिव्ह इन पार्टनरने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता. प्रियकरानेच तरुणीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर अर्जुन घरडे (४८, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर नीतू (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडले?
जरीपटका परिसरात २ मार्च रोजी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. मात्र पोस्ट मार्टममध्ये प्रियकराचे पितळ उघडं पडलं व गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचं अहवालातून समोर आलं. संशयातून पोलिसांनी गंगाधरला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबूल केला. गंगाधर रंगकाम करतो. पेंटिंगचे काम करतो. १ मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतूचा गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर रात्रीच्या अंधारातच तिचा मृतदेह घरासमोरील सीताफळाच्या झाडाला लटकवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसात नीतूने आत्महत्या केल्याची वर्दी दिली. नीतूच्या कुटूंबीयांनी सांगितले की, तिने आधी लग्न झाले होते तसेच तिला पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या. २०१७ पासून ती पतीपासून वेगळी रहात होती. ती काम करून उदरनिर्वाह चालवत होती. २०१९ मध्ये तिने गंगाधरशी लग्न करत असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांच्यासोबत राहू लागली.