कर्जमाफीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांची भेट

शनिवार, 18 मार्च 2017 (10:43 IST)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याखेरीज राज्यातील पांडुरंग फुंडकर, सुभाष देसाई, दिवाकर रावते, सुभाष देशमुख, एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, रामदास कदम हे मंत्री आणि संजय कुटे, प्रशांत बंब, अनिल कदम, विजय औटी आदी आमदार होते. राज्यातील शेतकऱ्यांवर ३0 हजार ५00 कोटी रुपयांचे कर्ज आहे. महाराष्ट्रातील १ कोटी ८ लाख शेतकऱ्यांवर १ लाख ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, ३१ लाख शेतकऱ्यांवरील कर्जाची मुदत संपली असल्याने, ते संस्थात्मक पत पुरवठ्याच्या कक्षेतून बाहेर जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संस्थात्मक पत पुरवठ्याच्या कक्षेत आणण्यासाठी, केंद्र सरकारने ठोस योजना तयार करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अरुण जेटली व कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हीही आमचा आर्थिक वाटा उचलण्यास तयार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा