सरकार असंघटित वर्गाकडे दुर्लक्ष करण्याचे महापाप करत आहे - जयंत पाटील

सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (15:27 IST)
नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. नंदुरबार जिल्ह्यात पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिन्याभरात बुथ कमिट्या पूर्ण होतील अशी पदाधिकाऱ्यांची ग्वाही मिळाली असून पक्षाचे संघटन मजबूत होईल याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. काल सरकारने महामंडळांच्या अध्यक्षांची घोषणा केली त्यात नरेंद्र पाटील यांनाही अध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसऱ्यांची मुले घेऊन फिरण्याची सवय भाजपला आहे हे भाजपने पुन्हा सिद्ध केले. तुकडे फेकून विरोधी पक्षातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे काम भाजप करत आहे. यातून स्पष्ट होते की भाजप पक्ष किती कमकुवत झाला आहे, अशी टीका पाटील यांनी भाजपावर केली आहे.
 
नंदुरबार येथील आदिवासी आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला यावर जयंत पाटील यांनी भाजपावर दणाणून टीका केली. आदिवासी मंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली नाही, मुख्यमंत्रीदेखील त्यावर काही बोलले नाहीत. हे सरकार असंघटित वर्गाकडे दुर्लक्ष करण्याचे महापाप करत आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. त्या आश्रम शाळेला आदिवासी मंत्र्यांनी भेट द्यायला हवी होती. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा करायला हवा होता. पण तसे झाले नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.
 
सनातन संस्थेच्या अटक झालेल्या साधकांच्या हिटलिस्टवर आ. जितेंद्र आव्हाड  आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या हत्येचा कट होता असे समजत आहे. जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा वाढवली पाहिजे, अशी आमची पक्षाकडून मागणी आहे. सरकारने यात कोणतीही तडजोड करू नये, अशी मागणी त्यांनी केली. सरकार सनातन संस्थेवर काहीच बोलत नाही, सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक करणे म्हणजे विषय वळवण्याचा प्रयत्न आहे. सरकार या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहे हे स्पष्ट होते असे पाटील त्यांनी सांगितले. मराठा-धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहे. सरकार फक्त खेळ बघण्याचे काम करत आहे. मराठा - धनगर समाजाला निवडणुकांच्या पूर्वी आरक्षण दिले जाईल आणि मोठ्या जाहिरातबाजी करत त्याचा गाजावाजा केला जाईल. तोपर्यंत हे सरकार आरक्षणाची घोंगडी तशीच भिजत ठेवेल असे स्पष्ट मत पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती