कायदा सुव्यवस्था, प्रसारमाध्यमे, सरकार सर्वच गोष्टी हातात घेत आहे - जयंत पाटील

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (15:49 IST)
- पक्षाचे वक्ता प्रशिक्षण शिबिर खंडाळा येथे सुरू
 
मोदी सरकारविरोधात पुढील ८ -१० महिने कोणतेही प्रसारमाध्यम बोलणार नाही असे चित्र दिसत आहे. अनेक संपादक आणि पत्रकारांचे राजीनामे हे त्याचे उदाहरण आहेत. कायदा सुव्यवस्था, निवडणूक यंत्रणा, प्रसारमाध्यमे हे सरकार सर्व गोष्टी आपल्या हातात घेण्याचे काम करत आहे अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली. खंडाळा येथे पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण शिबिरास आजपासून सुरुवात झाली आहे. या शिबीराच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना जयंत पाटील बोलत होते.
 
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारने आजवर १०६ योजना पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरी परिस्थिती तशी नाहीच. या सरकारच्या बऱ्याच योजना लोकांना माहीत देखील नाहीत. स्कील डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून आजवर ४० कोटी लोकांचे स्किल डेव्हलपमेंट केल्याचे सांगितले जात आहे पण आजपर्यंत हा आकडा २ कोटीपर्यंत देखील पूर्ण झाला नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की हे सरकार नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेईल अशी शक्यता आहे. सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेतला तर समजा निवडणूका जवळ आल्या आहेत.
 
आघाडी सरकारच्या काळात पक्षाच्या वतीने मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम वक्त्यांनी करावे. हे सरकार एप्रिल - मे महिन्यादरम्यान निवडणुका घेईल असे चिन्ह आहेत. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील काही महिने पक्षाच्या कामकाजावर जोर देण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
 
आपला पक्ष सर्वधर्म समभाव आहे. आपल्या पक्षात सर्वच समाजाचे हित जोपासले जाते हे पक्षातील वक्त्यांनी प्रामुख्याने मांडावे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटीच्या बैठकांमध्ये हे सर्व विचार वक्त्यांनी मांडायला हवेत असेही ते शेवटी म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे वक्ता प्रशिक्षण शिबिर दोन दिवस चालणार असून विविध क्षेत्रातील अभ्यासक, वक्ते या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराची उद्या सांगता होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती