कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही कुठली समिती तयार करणार आहे का?

बुधवार, 21 डिसेंबर 2022 (14:59 IST)
महाराष्ट्र सरकार कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबतच्या उपाययोजनांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. केंद्र सरकारही उपाययोजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही कुठली समिती तयार करणार आहे का? कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येत विशेष काळजी घेण्याची गजर आहे. कोरोनाकाळात कुठली यंत्रणा तत्काळ उभी करायची याचा अनुभव तेव्हाचे प्रशासन आणि सरकारला आहे. तुम्हीही तेव्हा विरोधी पक्षात होता तरीही सहकार्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मला तातडीचा वाटत आहे. कारण एकदा संसर्ग वाढला की विमानं बंद करावी लागतात. संपूर्ण देशही काही दिवस लॉकडाऊन करावा लागला होता. याचा विसर सभागृहातील सदस्यांनी पडू देऊ नये. तसेच सरकारने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते.
 
अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल. तसेच तुम्ही सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स तत्काळ गठीत करू. हा टास्क फोर्स बदलत्या परिस्थितीतवर लक्ष ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना देईल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती