कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आढळला यादवकालीन शिलालेख

बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (07:34 IST)
अंबाबाई मंदीरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरू असतानाच सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख मंगळवारी आढळला. संस्कृत भाषेतील आणि देवनागरी लिपीत असलेला हा शिलालेख २ फुट लांब आणि एक फुट रुंद आहे. गध्देगाळी प्रकारातील आणि दानपत्र स्वरुपाच्या या शिलेलाखांवर १६ ओळी कोरल्या असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
 
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर मूळ स्वरुपात यावे, यासाठी सुरु केलेल्या संवर्धन प्रकल्पानुसार मंदीरातील संगमरवरी फरशी काढण्याचे काम सुरू आहे. सरस्वती मंदीर प्रदक्षिणा मार्गावर पूर्वभिंतीत शिलालेख आढळून आला. हा शिलालेख बाराव्या शतकातील असल्याची प्राथमिक माहिती मंदीर सहाय्यक व्यवस्थापक आणि धर्मशास्त्र विभागाचे गणेश नेर्लेकर-देसाई यांनी दिली, यासंदर्भात शिलालेखाचे भाषांतर पूर्ण झाल्यानंतर प्रशासन व्यवस्थापन आणखीन माहिती देणार असून यातून नवीन माहिती उजेडात येण्याची शक्यताही वर्तवली आहे.
 
मुळ मंदीराचा भाग असलेला हा शिलालेख दगडी बांधकामात भिंतीसाठी आडवा दगड म्हणून वापरला गेला असावा. हा लेख शापाशिर्वादात्मक आणि दानपत्र स्वरुपात असण्याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. यामुळे श्रीकरवीरनिवासीनी अंबाबाई मंदिरातील इतिहासात मौल्यवान भर पडली आहे.
-गणेश नेर्लेकर-देसाई
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती