नाशिक : शिंदे गट खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना नाशिकमध्ये लोकसभेला उभे राहण्याचे आव्हान दिले होते. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून हेमंत गोडसे यांचा उल्लेख मच्छर असा केला आहे. त्यांना कोणीही पाडू शकते असा दावा राऊत यांनी यावेळी केला आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संजय राऊत यांचा काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा झाला. त्यांच्या दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटात खळबळ उडवून टाकली होती. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटावर शरसंधान केले होते. त्यांनी केलेल्या टीका नाशकातील पदाधिकाऱ्यांचे जिव्हारी लागल्या होत्या. राऊत म्हणाले होते की, “शिवसेनेतून गद्दारी करुन बाहेर पडलेले 40 आमदार आणि 13 खासदारांंच्या कपाळावर उमटलेला गद्दारीचा शिक्का कायम राहणार आहे. अशी जहरी टीका शिंदे गटावर केली होती.
यावर संजय राऊत यांनी आता हेमंत गोडसे यांना उत्तर दिले असून ते म्हणाले, “एकनाथ शिंदे गटात गेलेले नाशिकचे खासदार गोडसे हे तर मच्छर आहेत. त्यांची काहीही राजकीय क्षमता नाही. त्यांना निवडणुकीत कोणीही पराभूत करू शकते. अशी सडकून टीका संजय राऊत यांनी हेमंत गोडसे यांच्यावर केली आहे.
राऊत पुढे म्हणाले, ” ते विद्यमान खासदार होते, केवळ तेव्हढ्या कारणाने त्यांना गत निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यांच्याविषयी पक्षात तेंव्हाही नाराजीच होती.” असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.