महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनने वेग घेतला आहे. गेल्या १२ तासांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई येथे १९ जून ते २२ जून दरम्यान राज्यात सक्रिय मान्सूनमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.
तसेच पालघर व्यतिरिक्त, पुणे आणि नाशिकच्या घाट भागात बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी १९ जून रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मुंबई-ठाण्यात ऑरेंज अलर्ट
बुधवार सकाळपासून मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आता ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
राज्याच्या इतर भागातही सतर्कतेचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया, लातूर, बीड, नांदेड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या, डोंगराळ भागात आणि भूस्खलनाच्या प्रवण भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.