महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा, सर्वत्र सरासरीपेक्षाही जास्त पाऊस

शुक्रवार, 28 जुलै 2023 (07:29 IST)
हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
27 जुलै रोजीही कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
 
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
 
पावसाची ही स्थिती अशीच पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उद्याही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान विभाग, पुणे या संस्थेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांच्या मते, पुढील 24 तास ही स्थिती कायम राहणार आहे. राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
 
विदर्भात संततधार
वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता काल रात्री हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती.
 
वर्धा जिल्ह्यात रेड अलर्ट आणि पाऊस परिस्थितीच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुटी जाहीर करण्या आली आहे. अंगणवाडी केंद्रानाही सुट्टी जाहीर झाली आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्वच शाळा बंद ठेवण्यात येत आहे.
 
कोल्हापुरात प्रशासन सज्ज
कोल्हापूर जिल्ह्यातही पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 40.05 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा सकाळी 4.24 मिनिटांनी बंद झाला असून सध्या 4 दरवाजांतून विसर्ग सुरू आहे.
 
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील पूरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज, तरी संबंधित क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
 
राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले
 
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर गेली आहे तर पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 
राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाला स्वयंचलित वक्र आकाराचे सात दरवाजे असून सात पैकी तीन, चार, पाच, सहा आणि सात क्रमांकाचे दरवाजे  उघडले आहेत.
 
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूर परिस्थिती हाताळण्याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, "कोल्हापूरमध्ये 45 फुटांपर्यंतचे जे क्षेत्र आहे उदा. सुतारवाडा. आणि अशा काही महत्त्वाच्या भागात महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून लोकांना अलर्ट करत आहेत. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याबाबतची जनजागृती कालपासूनच सुरू करण्यात आली होती.
 
2019 आणि 2021 मध्ये आलेल्या पुराचा लोकांना अनुभव आहे. त्यामुळे लोकांनी योग्य ती तयारी केली आहे आणि ते योग्य ते सहकार्य करत आहेत. कोल्हापूर ग्रामीण आणि करवीर तालुक्यातही याची तयारी झाली आहे. आंबेवाडीसारखं गाव ज्यांच्यावर कायम प्रभाव पडतो, त्या गावात पूर्ण तयारी झाली आहे. त्या गावात निवारागृहाची सोय करण्यात आली आहे."
 
"या सर्व निवारागृहात लोकांच्या नीट राहण्याची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची जनावरांची राहण्याची, त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. लोकांना योग्य माहिती वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि सर्वांचं सहकार्य लाभत आहे."
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती