पाठिंबा हाेता; मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली?

गुरूवार, 29 जून 2023 (21:12 IST)
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत झाला नव्हता. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाला, असा गौप्यस्फोट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना शरद पवारांनी राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेच्‍या प्रश्‍नावर भाष्‍य करत फडणवीसांना टोला लगावला.
 
यावेळी पवार म्‍हणाले, ‘सर्वात चिंतेचा भाग म्‍हणजे राज्‍यात महिला आणि मुलींवर हल्‍ल्‍यांचे प्रकार वाढत आहेत. ठाणे, मुंबई, पुणे सोलापूर आणि पुणे येथून २४५८ मुली बेपत्ता झाल्‍या आहेत. राज्‍यात महिला आणि मुली बेपत्ता होण्‍याचे प्रमाण वाढ आहे. राज्‍यातील १४ जिल्‍ह्यांमधून एकूण ४हजार ४३१ मुली बेपत्ता झाल्‍या असून ही अत्‍यंत गंभीर आहे. राज्‍यातील गृहमंत्र्यांनी इतर गोष्‍टींवर बोलण्‍यापेक्षा बेपत्ता मुलींच्‍या कुटुंबीयांच्‍या दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न करावा.” राज्‍यात महिलांच्‍या सुरक्षेबरोबरच जात आणि धर्मांच्‍या नावाखाली दंगली घडवल्‍या जात आहेत. जेथे भाजपची सत्ता तेथे दंगली होतात, असा आरोप त्‍यांनी केला.
 
… मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली ?
फडणवीस म्‍हणतात, माझ्‍यासाेबत चर्चा करुन शपथ घेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला हाेता. सरकार स्‍थापन करण्‍याबाबत आमची चर्चा झाली होती.  माझा पाठिंबा होता तर चोरुन पहाटे शपथ घेण्‍याची वेळ त्‍यांच्‍यावर का आली आणि सत्ता तीन दिवसांमध्‍ये कशी गेली? असा सवाल करत सत्तेसाठी फडणवीस काहीही करु शकतात, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती