गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही”

सोमवार, 5 डिसेंबर 2022 (08:13 IST)
जळगाव – छत्रपती शिवराज शिवाजी महाराज यांच्या विषयी सध्या महाराष्ट्रात काही राजकीय नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता या वादात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य केल्यामुळे प्रसाद लाड यांचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक शब्दात समाचार घेतला.
 
राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने आदर्श होते, असे वक्तव्य केल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना शिवाजी महाराजांशी केली. त्यानंतर आता भाजप नेते व प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा जोरदार शब्दात इशारा देत घराचा आहेर दिला आहे.
 
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा का असेना त्याला माफ केले जाणार नाही, असाही इशारा गुलाबराव पाटील दिला आहे. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी या नालायकांना नाही. मंत्रीपद गेले खड्ड्यात मात्र शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
 
पाटील आणखी पुढे म्हणाले की, चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकार लवकरच पडेल, अशी टीका केली असताना त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. तसेच एकनाथ खडसे यांच्यावरही गुलाबराव पाटील टिका केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती