कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.