मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या टोळीत विमानतळाच्या फूड कोर्टमध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. हे कर्मचारी विमानतळाच्या आत तस्करांकडून सोने घेत होते. नंतर ते हे सोने बाहेर काढायचे आणि सहजपणे इतरांच्या हवाली करायचे. त्यांच्याविरोधात डीआरआयला गुप्तचर माहिती मिळाली होती.
अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर विमानतळाबाहेर नेत असताना सोन्याची दोन खेप पकडण्यात आली. डीआरआयच्या पथकाने सोने पोहोचवणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना आणि 3 रिसीव्हरला अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हे सोने 8 पोत्यांमध्ये लपवून आणले होते. 24 अंडाकृती सोन्याचे गोळे मेणाच्या पिशव्यांमध्ये लपवले होते.यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचे वजन केले असता त्याचे वजन 12.5 किलोग्रॅम असल्याचे आढळून आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 9.95 कोटी रुपये आहे. सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत डीआरआय मुंबईने सुमारे 36 किलो सोने जप्त केले आहे. जे तस्करीच्या माध्यमातून आणले होते.