पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती; जिल्ह्यातील तीन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (08:34 IST)
नाशिक - आज सायंकाळी नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाने जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील तीन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये गंगापूर धरणाचा समावेश असल्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
 
नाशिक जिल्ह्यात यावर्षी पाऊस हा अल्प प्रमाणात झाला. परंतु सातत्याने पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांना फटका बसत होता. काही ठिकाणी पीकही जळून गेले. परंतु मागील पंधरा दिवसापासून सुरू  असलेल्या पावसामुळे काहीसे जीवदान या पिकांना मिळाले होते. पण आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या जोरदार सरींनी शेतकऱ्यांसह नाशिककरांना चांगलाच दिलासा दिला आहे. आज सायंकाळी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
 
त्यामुळे जिल्ह्यातील तीन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये गंगापूर धरणातून 3318 क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज रात्री 11 वाजता 3434 ने वाढवून 6752 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
 
सुरुवातीला धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे या पाण्याचा विसर्ग कमी होता. परंतु नंतर हा पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर रात्रीतून पावसाचा जोर वाढला तर या पाण्याचा विसर्ग देखील वाढविण्यात येणार आहे. तसेच कडवा धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे या धरण क्षेत्रातून देखील 212 पाणी हे कडवा नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे.
 
नांदूर मधमेश्वर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून या ठिकाणावरून 7190 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
 
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये बुजवलेले रस्ते देखील या पावसामुळे पुन्हा खुले झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये रस्त्यावर खड्डे तयार झाले होते.
 
गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी जोरदार पाऊस आल्यामुळे गणेश मंडळाचे देखील काहीशी हाल झाले तर गणेश भक्तांना देखावे पाहण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती