मोदींच्या सभेत तिला मिळाले नाही पाणी सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू

धक्कादायक गोष्ट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे. बाबूराव गुटेवार (१२) रा. शिवाजी वार्ड पांढरकवडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
 
क्षितीजा ही यवतमाळ येथील  पांढरकवडा  जिल्हा परिषद विद्यालयाची सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. पांढरकवडा येथे शनिवार १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच आॅटोरिक्षाने गेल्या होत्या. सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्ह वाढले होते.

जेथे  मेळावा होता त्या  ठिकाणी पाण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती, त्यामुळे अनेक महिलांचा जीव कासावीस झाला, तहानेने  घसा कोरडा पडला, सुरक्षेच्या कारणावरून ‘या जागीच बसून रहा’ असे  पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले होते.  वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी सकाळी क्षितीजाची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती