दहावी, बारावीच्या बोर्डाच्या निकालात मुलींच्या सरशीची ही आहेत कारणं...

- रोहन नामजोशी
आज दहावीचा निकाल लागला आणि पुन्हा तीच हेडलाईन पुढे आली, जी प्रत्येक निकालानंतर हमखास बातम्यांमध्ये कायम वाचायला मिळते - "मुलींची निकालात सरशी."
 
एका वृत्तानुसार 82.82 टक्के मुलींनी दहावीचा टप्पा पार केला आहे तर 72.18 टक्के मुलांना हे यश आलं आहे. एकूण निकाल 77.10 टक्के लागला आहे.
 
हे दहावी-बारावीच नाही तर इतर स्पर्धा परीक्षांनाही लागू आहे. मुलींनी निकालात आघाडी घेण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलं आहे. असं का होतं? अत्यंत स्तुत्य अशा बदलांच्या मागची कारणं काय आहेत?
 
नागपूरमधील जीवशास्त्राच्या शिक्षिका सोनाली तेलंग अनेक वर्षं खासगी शिकवण्या घेतात. त्यांच्या मते मुली मुळातच मन लावून सगळ्या गोष्टी करतात. "त्यांना जे सांगितलं ते अगदी आनंदाने आणि मन लावून करतात. त्यांची एकाग्रता चांगली असते आणि त्या फोकस्ड असतात. ज्या मुलींना उत्तम गूण मिळालेत त्या मोबाईल, सोशल मीडिया यांच्यापासून दूर असतात."
 
"मुलींना या आधी शिक्षणाच्या संधी फारशा मिळत नसत. आता मात्र पालक मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. ते मुलींना अधिकाअधिक संधी प्राप्त करून देत आहेत. त्यातही मुलींच्या आया वडिलांपेक्षा जास्त आघाडीवर असतात. त्यामुळे इतके वर्षं दडपलेल्या संधी मिळाल्यामुळे मुली त्याचा योग्य फायदा घेत आहेत," असंही त्या पुढे म्हणाल्या.
 
विविधांगी परिस्थितीशी सामना
मानसोपचार तज्ज्ञ अक्षता भट म्हणतात, "जेव्हा शिक्षणाचा प्रश्न असतो तेव्हा मुली मुलांपेक्षा जास्त कष्ट करतात. त्यांच्यावर दबावही जास्त असतो. संधी कमी असतात त्यामुळे त्या संधीचं सोनं करायचं असेल उत्तम शिक्षण आणि पर्यायाने जास्त मार्क हवे असतात. भारतात लिंग गुणोत्तरही विषम आहे. त्याचे परिणाम विविध पद्धतीने दिसतात. उच्च शिक्षणासाठी त्यांना जागाही कमी असतात. त्यामुळे त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात.
 
याबरोबरच काही सामाजिक बाबींकडेही भट लक्ष वेधतात. "हल्ली मुली महत्त्वाकांक्षी असतात. स्वत: पैसा कमवायचा आहे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. म्हणजे लग्न केलं किंवा नाही केलं तरी स्वत:च्या पायावर उभं राहणं ही मुलींची प्राथमिकता झाली आहे. पुढे मुलांना आणि मुलींना मिळणाऱ्या पगारातही तफावत असते त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी उत्तम शैक्षणिक पाया उभारण्याची जाणीव मुलींना असते. म्हणून मुलींनी शिक्षणात आघाडी घेतल्याचं त्या सांगतात.
 
त्याचवेळी शिक्षण आणि बुद्धी ही लिंगाधारित नसते, असं मत मानसोपचारतज्ज्ञ शीतल बीडकर यांना वाटतं.
 
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांच्या मते मुलींनी निकालात आघाडी घेणं ही आजची परिस्थिती नाही. अगदी दहा पंधरा वर्षं हीच स्थिती होती आणि आकडेवारीही त्याची द्योतक आहे. मुली अधिक मेहनती असणं यातच त्यांच्या यशाचं रहस्य दडलं आहे. असं त्यांना वाटतं.
 
मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 82.40 टक्के मुलं पास झाली आहेत. गेल्या पाच वर्षांच्या मुलाींच्या आणि मुलांच्या उत्तीर्ण होण्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
वर्ष मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी
2019 90 82.40
2018 92.36 85.23
2017 93.20 86.65
2016 90.50 83.46
2015 94.29 88.20

सकारात्मकता आणि जबाबादारीचं भान
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यामते प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करण्याचा मुलींचा स्वभाव असतो. घराची कामं त्यांना टाळता येत नाहीत त्यामुळे वेळ वाया न घालवण्याचा त्यांचा स्वभाव असतो. जेव्हा एखाद्याला कमी वेळ असतो तेव्हा तो वाया न घालवण्याचा कल असतो.
 
"मुली लवकर बोलतात. तसंच त्यांना जबाबदारीची जाणीवही लवकर येते. आजूबाजूच्या परिस्थितीचं भान त्यांना लवकर येतं. शाळेमध्येही आम्ही पाहतो की एखादी जबाबदारी मुली पटकन घेतात. शाळेत एखादा उपक्रम असेल तर त्या पटकन त्यात पुढाकार घेतात," असं ते म्हणाले. या सर्व बाबींमुळे त्यांच्या यशस्वी शैक्षणिक कारकिर्दीची पायाभरणी होते.
 
मुलींच्या तुलनेत मुलांना जास्त स्वातंत्र्य असतं. या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याकडे मुलांचा कल जास्त प्रमाणात असतो. मुलींवर बंधनं जास्त असतात. ही गोष्ट चांगली नाही. तरीही या बंधनाचा सकारात्मक फायदा मुलींनी घेतला आहे, असं कुलकर्णी यांना वाटतं.
 
मुलींच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास होण्याची गरज ते व्यक्त करतात. मुलींना जिथेजिथे संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केल्याची अनेक उदाहरणं इतिहासात किंवा वर्तमानात सापडल्याचा उल्लेख कुलकर्णी करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती