या भागातील विद्यार्थी दुर्गम व अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधीचा अभाव आहे. अज्ञानामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे असतात.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे भविष्य उज्जवल होण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत प्रवाह येण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा चालवण्यासाठी 112 शासकीय व निमशासकीय आश्रमशाळांतील 1 समन्वय शिक्षक, 1 समन्वय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे, उपपोलीस स्टेशन किंवा आश्रमशाळेतील पोलिस मदत केंद्रातील समन्वय पोलिस कर्मचारी यांचा एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता.या स्पर्धेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आश्रमशाळांना दररोज 10 प्रश्न विचारले जात होते.
आश्रमशाळेचे समन्वयक शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात प्रश्न विचारत होते. अशाप्रकारे हा उपक्रम 6 महिने चालवल्यानंतर 27 जानेवारी रोजी 'वीर बाबुराव शेडमा सामान्य ज्ञान वार्षिक स्पर्धे'ची अंतिम परीक्षा घेण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील 112 आश्रमशाळांतील 23,935 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.