आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी अनेकजण उत्सुक असून गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुणे महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. गेल्या वर्षी ज्यांच्याकडे परवाना नाही किंवा जागेत बदल केला आहे, अशा मंडळांनी महापालिकेकडे परवाना घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
अशी आहे नियमावली
मागील वर्षापासून पुढील 5 वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, मंडपासाठी दिलेल्या परवानग्या ग्राह्य धरणार
ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे, 2019 मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल केला जात असेल तर नवीन जागेवर सर्व परवानग्या घेणे आवश्यक.
2019 च्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालय, पोलिस ठाण्याकडून सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील
परवान्यांसाठी महापालिकेतर्फे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
सर्व गणेश मंडळांनी 2019 च्या किंवा नव्याने घेतलेल्या परवान्यांची प्रत मंडप, कमानींच्या दर्शनी भागावर प्लास्टिक कोटिंगमध्ये लावावी
उत्सव मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा नसावी, 40 फुटापेक्षा उंच मंडप असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे
मंडप, स्वागत कमानी उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका, प्रवासी बस जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत, कमानीची उंची 18 फुटांपेक्षा जास्त ठेवावी
आवश्यकतेनुसार स्वयंसेवक/सुरक्षारक्षक नेमावेत
शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्या
संस्था, संघटना, मंडळ, नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे
उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी तीन दिवसांच्या आत मंडप, देखावे, कमानी उतरवून घ्याव्यात, रस्त्यावरील साहित्य ताबडतोब हटवावे
परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास परवाना उत्सव सुरू होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा महापालिकेला अधिकार
मंडप, कमानींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक
ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी
नागरिकांनो येथे तक्रार करु शकतत
उत्सव कालावधीत नागरिकांना तक्रार करण्यासाठी -
संकेतस्थळ : http://complaint.punecorporation.org
टोल फ्री क्रमांक : 1800 103 0222, सर्व महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकावर.
मोबाईल ॲप : PUNE Connect (PMC Care)
व्हॉट्सॲप क्रमांक : 968990002
मुख्य अतिक्रमण कार्यालय संपर्क क्रमांक : 020-25501398