मोफत एस.टी.ची. सेवा राज्य सरकारनं स्थगित केली आहे : अनिल परब

मंगळवार, 12 मे 2020 (06:44 IST)
एसटीनं राज्यातंर्गत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोचवण्यासाठी घोषित केलेली मोफत एस.टी.ची. सेवा राज्य सरकारनं स्थगित केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे.
 
लाल क्षेत्रात असलेल्या जिल्ह्यांमधून इतर जिल्ह्यांमध्ये कोणालाही पाठवू नका अशा असंख्य तक्रारी आल्या आहेत. तसंच मुंबईतून आलेल्यांमुळे आपल्या गावी कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, अशा अफवा पसरल्यानंही लोकांचा आंतरजिल्हा प्रवासाला मोठा विरोध होत आहे.
 
त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र राज्याबाहेर पायी जात असलेल्या नागरिकांसाठी, त्यांच्या राज्यांच्या सीमांपर्यंत, तसंच इतर राज्यांच्या सीमांवर अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी एस.टी.ची मोफत सेवा सुरु आहे असंही परिवनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
 
याशिवाय काल एका दिवसात अडीचशेहून अधिक बसनं इतर राज्यांच्या सीमांपर्यंत ५ हजार जणांना, तर इतर राज्यांच्या सीमांवरनं राज्यातल्या ३ हजार जणांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात सोडल्याची माहिती त्यांनी दिली. 
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा तऱ्हेनं नियोजन करून राज्यातला जिल्ह्यांतर्गत प्रवासाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती