पूल कसे असावेत राज यांचे मार्गदर्शन

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (12:01 IST)

मुंबई येथील रेल्वे पुलावर झालेल्या अपघाता नंतर मनसेने कठोर भूमिका घेतली आहे. यामध्ये पुन्हा राज ठाकरे यांनी विकास कसा असावा. बांधकाम कसे करावे किंवा नागरीकांना सेवा कशी दिली जावी याविषयी त्यांच्या फेसबुक अधिकृत पेजवर सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सागितले की ही कोणावर टीका नाही मात्र सुविधा देताना नक्की याचा विचार व्हावा . 

राज ठाकरे काय म्हणतात : 

आज एका पुलाविषयीच्या माहितीपटाचा दुवा (link) तुम्हाला देतो आहे. तुमच्या मनात विचार येईल की पुलासारखा पूल, त्यात अगदी आवर्जून बघावं असं काय असणार? काही वर्षांपूर्वी पर्यंत समुद्रावरचे मोठमोठाले पूल परदेशी सिनेमांमध्ये बघायचो. मग मुंबईत वांद्रे ते वरळी असा सागरी सेतू झाला. त्यामुळे परदेशातल्या एखाद्या पुलाचं, त्याच्या स्थापत्यशास्त्राचं कौतुक म्हणून दाखवत नाहीये. मला कौतुक वाटलं ते त्यांच्या दृष्टिकोनाचं.

अमेरिकेतल्या फ्लोरिडा शहरातला '७ मैल पूल' (seven miles bridge ) हा साधारणपणे ११ किलोमीटर लांबीचा पूल. १९०१ ते १९१२ या काळांत तो रेल्वेसाठी म्हणून बांधला गेला. अमेरिकेत रेल्वे सेवा खाजगी असण्याचा तो काळ होता. १९३५ च्या वादळांत पुलाचं नुकसान झालं. मग त्या रेल्वे कंपनीने तो पूल अमेरिकन सरकारच्या हाती सुपूर्द केला. सरकारने तो खाजगी गाड्यांसाठी मोकळा केला. पुन्हा १९६० ला वादळाने पुन्हा या पुलाचं नुकसान झालं. आणि मग अमेरिकन सरकारने सध्याचा पूल १९७८ ला बांधायला घेतला आणि १९८२ ला पूर्ण केला. जेंव्हा हा पूल बांधला गेला तेंव्हा तो जगातला सगळ्यात मोठा पूल म्हणून ओळखला जायचा, त्यानंतर मात्र याच्याही पेक्षा मोठे पूल बांधले गेले.

आता नवीन पूल वाहतुकीसाठी तर जुना पूल सायकली चालवण्यासाठी किंवा लहान मुलांना फिरण्यासाठी राखीव ठेवलाय. तिथे वर्षातून एकदा मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते. मी वर ज्या दृष्टिकोनाबद्दल बोललो तो हाच, की त्यांनी नवीन पूल बांधला म्हणून जुन्या पुलाकडे करा दुर्लक्ष असं नाही केलं. त्यांनी तो ही वापरात ठेवला.

नवीन ते स्वीकारावं, जुनं ते पण राखावं. हा आपल्या आणि त्यांच्या दृष्टिकोनातला फरक. आपल्याकडे वाशी येथे दोन पूल आहेत. पण नवीन पूल झाल्यावर जुन्या पुलाकडे आपण दुर्लक्ष केलं. तो काही प्रमाणात वापरात असतो. पण का नाही हा पूल किंवा राज्यातले इतर पूल नीट डागडुजी करून आपण सायकलींसाठी, लहान मुलांना खेळायला, फिरायला देऊ शकत?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती