सांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’

मंगळवार, 10 जानेवारी 2017 (15:30 IST)
सांगलीत लवकरच जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’  साकारले जाणार आहे. २५ हजार चौरस फुटातील प्रस्तावित इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात आले असून, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध होणार आहे. १९४१ मध्ये बुद्धिबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर यांनी स्थापन केलेल्या येथील नूतन बुद्धिबळ मंडळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली असून या मंडळाने राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची पन्नास वर्षांची अखंड परंपराही जपल्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले गेले आहे. २८ डिसेंबर रोजी क्रीडा संचालकांकडे भवनासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत पाचमजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी हा आराखडा केला आहे. सहा कोटी ५८ लाखांचा हा प्रस्ताव आहे. कोणत्याही दिशेने या इमारतीकडे पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी ही रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही एक मोठा पट अंथरल्याचे चित्र दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आवश्यक असणारी काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षक गॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्था येथे प्रस्तावित आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंना खेळता येईल आणि राहता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा