नागपूर- नाशिक- मुंबई असा एक महामार्ग प्रोजेक्ट होतो आहे. हजारो शेतकरी याला विरोध करत आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष देत आहेत. मात्र हा इतका मोठा प्रोजेक्ट आहे तरी कसा? नेमका समृद्धी महामार्ग काय आहे? तो कोठून जाणार आणि राज्याला काय फायदा होणार. जाणून घ्या समृद्धी महामार्गाबाबत सर्व काही........
या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचा हेतू हा प्रवासी आणि मालवाहतुक जलदगतीनं आणि सुरळीतपणे शक्य व्हावी असा आहे. ज्यासाठी त्यामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक वाहतुक व्यवस्थांच्या आधारे दुर्गम भागांत रस्ते पोहचवण्याचं महत्वाचं काम अंतर्भूत आहे. या द्रुतगती महामार्गामुळे देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोचता येईल. या ठिकाणांजवळ नोकरी-व्यवसायाच्या, आरोग्य सेवेच्या, व्यापाराच्या, उद्योग-धंद्याच्या, शिक्षणाच्या संधी आणि इतर गरजेच्या सेवा अगदी सहजपणे उपलब्ध असतील.
हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यातून जात असून तो नागपूरला मुंबईपर्यंत तर जोडेलच पण त्यामुळे हे सर्व जिल्हे व अन्य १४ जिल्हे मुंबईतील JNPT सारख्या देशातल्या एका सर्वात मोठ्या मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होईल.
महामार्गावरील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी राज्यमार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित केले जाईल. यामुळे चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे १४ जिल्हेही या मार्गाशी जोडले जातील. म्हणजे राज्यातले एकूण २४ जिल्हे या द्रुतगती मार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत.
या द्रुतगती महामार्गालगत असलेली महत्त्वाची पर्यटन स्थळंही जोडली जाणार आहेत.
हा द्रुतगती महामार्ग ७०० कि.मी. लांबीचा असेल आणि १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना थेट जोडेल.
या महामार्गावरील वेगमर्यादा १५० कि.मी. असेल यामुळे नागपूर आणि मुंबई यामधला प्रवास केवळ ८ तासांचा होईल. यामुळे नागपूर ते औरंगाबाद हे अंतर ४ तासांत तर औरंगाबाद तेमुंबई हे अंतर पुढच्या फक्त ४ तासांमध्ये पार होऊ शकेल.
या महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी),वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना येथील ड्राय पोर्ट आणि मुंबईचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणं एकमेकांना जोडली जातील.
हा महामार्ग १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही.महामार्गाच्या दोन्ही बाजूला पूरक रस्ते (सर्व्हिस रोड्स) असतील. हे रस्ते द्रुतगतीमार्गाच्या खालून जाणाऱ्या भुयारी मार्गाशी जोडले जातील.
या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे, वहानांसाठी ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग इतके महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसंच स्थानिक जनतेलाही महामार्गाचा कोणताच अडथळा त्यांच्या दळणवळणात होणार नाही आणि अपघात टाळले जातील.