अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर चुकीची कागदपत्रे सादर करून दिशाभूल केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिनिधीत्व केले.
अजित पवार गटाच्या या युक्तिवादानंतर आज शरद पवार गटाने आपली बाजू मांडली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना शरद पवार गटाची बाजू दोन तास लावून धरली. सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगात जवळपास दीड तास सुनावणी सुरु होती. आजच्या सुनावणीत पहिल्यांदाच युक्तिवादाला करताना आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अजब गोष्टी निवडणूक आयोगासमोर मांडल्या. अजित पवार गटाने जे मुख्य दस्ताऐवज निवडणूक आयोगासमोर सादर केले होते, त्यापैकी 20 हजार प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 8900 प्रतिज्ञापत्रांचा एक चार्ट बनवून निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. ” असा खुलासाही अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांसमोर दिला.