अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असली तर काही भागांमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून या भागात पेरणीसाठी पारंपारिक पद्धतीने गो वंशाचा उपयोग करण्यात येतो. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी पेरणीचे काम सुरु असताना ढगाळ वातावरण होते तर काही भागांत जोरदार वारा व पाऊस सुरु झाला. अशात अनेक घरांचे छप्पर उडून गेले, झाडे उलमळून पडली तसंच पारडी येथील एका वडाच्या झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळली. या दुर्घटनेत तुटलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे तब्बल १९ जनावरांना आपला जीव गमावावा लागला.