गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलाचा तपशील, मीटरचे रिडिंगसह वीजबंदचा कालावधी आणि इतर माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाचे संकलन करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. पुणे परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह इतर वर्गवारीतील २७ लाख २४ हजार वीजग्राहक आहेत. त्यातील सुमारे २६ लाख वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. विशेष म्हणजे एक लाख १४ हजार कृषिपंपधारकांपैकी सुमारे ९९ हजार ग्राहकांनीही मोबाइल क्रमांक नोंदविले आहेत. येत्या काही दिवसांत १०० टक्के मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिलाची रक्कम, बिल भरण्याचा दिनांक, भरणा केल्यानंतरचा तपशील ग्राहकांना पाठविण्यात येत आहे.