३४ जिल्ह्यांमधील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबरला होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे सांगितले.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील. छाननी ५ डिसेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत होईल.