एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा; ४० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत घेतला हा निर्णय

बुधवार, 22 जून 2022 (15:08 IST)
शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारण नाट्याने आता प्रचंड वेग घेतला आहे. गेल्या दोन-अडीच दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून हा राजकीय डावपेच आणि चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांचे फोटोसेशन केले. आपल्याला ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
 
आम्ही सर्व कट्टर शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जाणार आहोत. अद्याप शिवसेना सोडली नाही. सोडणारही नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमके आता पुढे काय होते याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. या सर्व आमदारांचा एक ग्रुप फोटो व्हायरल झाला असून भाजपाचे वरिष्ठ नेते या सर्व आमदारांच्या संपर्कात असल्याने सत्ता महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो बाळासाहेबांनी दिलेले कडवट हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. तीच आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातो आहोत. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. तसेच आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातो आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
कालपेक्षा आज अधिक आक्रमक होत शिंदे यांनी आता पुढील पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसे झाले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. तसेच, स्वतंत्र गटाद्वारे शिंदे भाजपला समर्थन देतात की आणखी काही करतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचे डावपेच सुरू केले आहेत. भाजपाचे १०६ आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे कथित ४० आणि अपक्ष अशी युती करून भाजपा बहुमताचा १४५ चा आकडा पार करणार अशा दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती