एकनाथ शिंदे मुलांच्या मृत्यूबद्दल बोलताना भावूक, काय घडलं होतं त्यांच्या आयुष्यात?
सोमवार, 4 जुलै 2022 (18:05 IST)
माझी दोन मुलं मी अपघातात गमावली...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डोळे पाणावले होते...आवाज दाटून आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. बहुमत सिद्ध केल्यानंतरच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलण्यासाठी सर्वांत शेवटी एकनाथ शिंदे उभे राहिले.
या भाषणात राजकीय भाष्य करता करता एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयुष्यातला वैयक्तिक संघर्षही सांगितला. यावेळी त्यांना आपल्या दोन मुलांचीही आठवण आली.
ती आठवणही व्यक्त करणं मला अवघड होत आहे, असं म्हणताना एकनाथ शिंदे यांना भरून आलं होतं.
माझी दोन मुलं अपघातामध्ये गेली आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं, असं त्यांनी म्हटलं.
"2 जून 2000 मधली ही घटना होती. मुलं खेळत होती, बोटिंग करत होती आणि अपघात झाला. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यांत काळा दिवस होता."
दीपेश आणि शुभदा अशी एकनाथ शिंदेंच्या मुलांची नावं होती. ही दुर्घटना झाली तेव्हा शिंदे यांची मुलगी 7 वर्षांची आणि मुलगा 11 वर्षांचा होता.
या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी राजकारणातून दूर जाण्याचा विचार केला होता.
त्यांनी सांगितलं, "श्रीकांत तेव्हा छोटा होता. तो, मी आणि श्रीकांतची आई...माझ्याकडे काहीच राहिलं नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं माझ्या कुटुंबासोबतच राहायचं. ते सगळेच कोलमडले होते. त्यांच्यासमोर मला रडताही येत नव्हतं. बोलताही येत नव्हतं. मी बाहेरही पडू शकत नव्हतो. "
या सगळ्या प्रसंगात आनंद दिघे यांनी आपल्याला साथ दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. आज (4 जुलै) विधानसभेतही बोलताना त्यांनी पुन्हा याचा उल्लेख केला.
आनंद दिघे एक दिवसाआड भेटायला यायचे. त्यांनीच आपल्याला समजावलं असं शिंदे यांनी म्हटलं होतं.
"मी त्यांना म्हटलं होतं की, आता मी काही काम करू शकत नाही. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचंय. माझी त्यांना गरज आहे. तेव्हा दिघेसाहेबांनी मला म्हटलं की, तुझी समाजालाही गरज आहे. लोकांसाठी पण काम कर. तुझं कुटुंब काही छोटं नाही, मोठं आहे. मी थोडा वेळ मागून घेतला. माझ्या कुटुंबासोबत वैष्णोदेवीला गेलो. तिथून आल्यावर त्यांनी मला ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. ते मला कल्याण, मुरबाड, पालघर इथेही कामानिमित्त पाठवायचे. त्यांच्या कामाला नाही म्हणायचोच नाही. तिथल्या कार्यकर्त्यांना सांगायचे की, मला दुसरं काम आहे म्हणून एकनाथला पाठवतोय."
एकनाथ कसं काम करतोय? माझी चॉइस बरोबर आहे ना? अशी आनंद दिघे चौकशी करायचे, असंही शिंदे यांनी 'माझा कट्टा' कार्यक्रमात आवर्जून नमूद केलं होतं.
एकनाथ संभाजी शिंदे यांचा वादळी प्रवास
ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.
एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून आलेत. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेवर निवडून जात आहेत. पण त्यांचा हा प्रवास सुरु झाला होता रिक्षाचालकापासून.उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कंगना राणावत काय म्हणाली?
'ठाणेवैभव' या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेची ओळख 'आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री' अशी करून देतात.
मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेंविषयी सांगतात, "सातारा हे एकनाथ शिंदेंचं मूळ गाव. ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागलं. आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले."
"वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
त्यानंतर 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं.
आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.
2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत.
शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.