ED: अर्जुन खोतकरांच्या घरासह कार्यालयांवर ED चे छापे
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (18:00 IST)
शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांवर अंमलबजावणी संचलनालयानं ईडीची छापेमारी सुरू केली आहे.
अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून तपासणी करण्यात येत आहे
आज (26 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून ईडीच्या 12 अधिकाऱ्यांचं पथक चौकशी करतंय.
दुसरीकडे, 10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.
ईडीच्या रडारवर असलेले महाविकास आघाडीतले 9 नेते
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागलेली 'ईडी' पिडा संपण्याचं नाव घेत नाहीये.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू कॅबिनेटमंत्री अनिल परब, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि माजी खासदार आनंदराव अडसूळांभोवती ईडी चौकशीचा फेरा पडलाय.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून 7 नेते आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.
गेल्या वर्षभरात अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या नोटीसा आल्या आहेत.
शिवसेना नेत्यांमागे लागलेली 'ईडी' पिडा
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वेगळी चूल मांडल्यानंतर भाजपने आपला मोर्चा महाविकास आघाडी सरकारकडे वळवलाय.
भाजप नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. शिवसेना नेतेही भाजपच्या निशाण्यावर आहेत.
शिवसेनेचे बडे नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
त्यात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठवली, तर आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली.