वारकरी संप्रदाय आणि राज्यातील मराठी जनतेला धक्का देणारा अपघात घडला असून, यामध्ये संत नामदेव महाराज यांचे 17वे वंशज यांचा मृत्यू झाला आहे. हा दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जीसीबी दिंडीत घुसल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
पंढरपूर ते आळंदी वारी करणाऱ्या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, मंगळवारी (19 नोव्हेंबर) सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये सोपान महाराज नामदास (वय 36) आणि अतुल महाराज आळशी (वय 24) अशी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. यातील सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत.
संत नामदेव पालखी सोहळ्याची दिंडी प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपूर ते आळंदी प्रवास करत होती. घाटात दिंडी उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जेसीबीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जेसीबी थेट दिंडीत घुसला आहे. काही क्षणात आरडाओरडा झाला मात्र या सुन्न करणाऱ्या अपघातात दोन वारकऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला. या अपघातात 15 वारकरी जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.