संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराहून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

शुक्रवार, 2 जून 2023 (20:22 IST)
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराहून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे 25 दिवस पायी प्रवास करून वारकरी आषाढ शुद्ध दशमी रोजी पंढरपूरात पोहोचणार आहेत.

टाळ मृदंगाच्या गजरात वीस हजार वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी मार्गस्थ झाली आहे. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होत असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरांतील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे.
 
सुरुवातीला संत निवृत्तीनाथ मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर रथाची पूजा झाली. चांदीच्या रथात निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या. निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करी पालखी निघाली. कुशावर्त तीर्थावर पालखीचे नगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
 
या पालखी सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो. त्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून चार लाख रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, एवढया मोठया दिंडी सोहळ्यात ही सुविधा अपुरी पडते. यामुळे वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये याकरिता संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निर्मलवारीसाठी फिरते टॉयलेट व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत पालखी सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर्स पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
 
याशिवाय 12 फिरते टॉयलेट्सदेखील पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच 30 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती