महाराष्ट्रात ‘डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार

शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (08:07 IST)
आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात ‘डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील चिंतन शिबिरात दिली.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आज या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले. या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खासगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया, नियामक संस्था, सायबर पोलीस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती