संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या उरण, नवी मुंबई येथील यशश्री शिंदे प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. 20 वर्षीय यशश्रीच्या निर्घृण हत्येचा आरोपी दाऊद शेख याला मंगळवारी पहाटे कर्नाटकातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दाऊदला उरण येथे आणून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक केली असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमे नंतर त्याला मंगळवारी कर्नाटकातून पोलिसांनी अटक केली.सध्या तो बेलापूर, नवी मुंबई येथे पोलिस कोठडीत आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी दाऊद शेख आणि पीडित यशश्री शिंदे हे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या मध्ये प्रेम संबंध होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते मात्र यशश्रीने लग्नासाठी नकार दिला. 25 जुलै रोजी तो तिला भेटायला आल्यावर त्यांच्यात भांडण झाले नंतर दाऊदने तिची निर्घृण हत्या केली.
वृत्तानुसार, 2019 मध्ये आरोपी दाऊद शेखवर यशश्रीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप होता. यशश्री त्यावेळी अल्पवयीन होती, त्यामुळे दाऊदवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. सुमारे 6 महिने तो तुरुंगात होता. नंतर त्याने पुन्हा यशश्रीशी जवळीक साधली. ते दोघे फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी त्यांनी भेटायचे ठरवले होते.
दाऊद शेखविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 103 (हत्या) आणि एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये मृत यशश्री हिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.