महाराष्ट्राचे नाव सुवर्णपदकांनी झळकावणाऱ्या जिगरबाज खेळाडूंचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सोमवार, 13 जून 2022 (21:08 IST)
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल अशी आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये ४५ सुवर्ण पदकांसह १२५ पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

पंचकुला (हरयाणा) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले नैपुण्य सिद्ध करून अंतिम पदक तालिकेत ४५ सुवर्ण ४० रौप्य आणि ४० कांस्य पदकांची कमाई केली आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
 
“महाराष्ट्राच्या नावावर जमा झालेल्या एका-एका पदकाच्या मागे तुमची जिद्द आणि जिगरबाज खेळी आहे. या प्रयत्नांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवण्यासाठी आपण घेत असलेल्या अथक मेहनतीला शासनाचे सदैव पाठबळ राहील,” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती