ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है…! छगन भुजबळांचा इशारा

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:24 IST)
ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है, आज तेरा है, कल मेरा होगा…’ अशा शायराना अंदाजात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरूनही भाजपवर हल्लाबोल करतानाच गर्भित इशाराही दिला आहे.
 
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. छगन भुजबळ यांनीही देगलूरमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीची पखरण करत आपल्या खास शैलीत भाजपवर हल्ला चढवला. ‘ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है आज तेरा है कल मेरा होगा…’ अशा शायराना अंदाजात भुजबळ यांनी ईडी च्या कारवायांबाबत वक्तव्य केले. कितीही कारवाया केल्या तरी मी बदलणार नाही, असंही ते म्हणाले.
 
ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै. रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते अश्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा जितेश रावसाहेब अंतापुरकर हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला आता आपली जबाबदारी आहे त्याला विजय केले पाहिजे. असं आवाहन त्यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहार राज्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे, असंही त्यांनी सांगितलं. देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत सर्वांनी आप आपसातले वाद मिटवत एकत्र आले पाहिजे आणि भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे, असे आवाहनच त्यांनी देगलूर वासियांना केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती