नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास एक स्फोट झाला. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं. तेच पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचारी एकच घाबरले असून लगेच पोलिसांना त्याची सूचना देण्यात आली. सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटके मिळून आले.
छोटे सौम्य प्रभावाचे स्फोटक त्यामध्ये पाठवण्यात आले होते. यात या स्फोटकाची संख्या जवळपास दहा असून त्यात एक स्फोटक फुटले. नाशिक मधील एका अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटकं जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्दीष्टाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे.
विशेष बाब म्हणजे नागपूर ते जनरल पोस्ट ऑफिस सिविल लाइन्स परिसरात असून जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेलं रविभवन हे सर्किट हाऊस आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा घर ही जनरल पोस्ट ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट होणं नक्कीच गंभीर बाब आहे.