भाजपने प्रचाराची पातळी सोडू नये, मुश्रीफांनी दिला इशारा

शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (21:27 IST)
कोल्हापूर; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक बिनविरोध करणे अपेक्षित असताना भाजपने उमेदवार देवून शहरावर निवडणूक लादली आहे. तसेच प्रचार सभेत खालच्या पातळीवर टिका केली जात आहे. महाविकास आघाडीचा महिला उमेदवार असताना खालच्या पातळीवर आरोप होत आहेत. येथून पुढे भाजपच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी सोडू नये, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.
 
कोल्हापूर उत्तर मतदार संघ पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या शहरआणि ग्रामिण कार्यकर्त्यांचा शुक्रवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथे मेळावा झाला. या मेळाव्याला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
 
शहरातील जनतेने चंद्रकांत जाधव यांना पाच वर्षासाठीच विधनसभेत पाठविले होते. परंतू त्यांच्या निधनामुळे ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लागली आहे. उत्तरच्या निवडणूकीत राष्ट्रवादीची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करा. 50 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने जयश्री जाधव यांना निवडून आणा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केल. तसेच जिल्ह्य़ातून राष्ट्रवादीचे 25 हजार कार्यकर्ते प्रचारासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के. पोवार, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील यांनी भाजपवर निशाना साधला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती